आपल्या जीवन प्रवासात आपण अनेक नद्यांना भेट दिलेली असते, पण सगळ्याच नद्या मनात ठसतात असे नाही. काही काही नद्या मात्र त्यांच्या किनाऱ्यांसह आपल्या आठवणीत कायम घर करून बसतात—त्यांच्या सौंदर्यामुळे, शांततेमुळे किंवा त्या ठिकाणी घडलेल्या खास अनुभवांमुळे.
या उपक्रमात मी ज्या ज्या नदीकिनारी राहिले आहे किंवा भेट दिली आहे, त्या ठिकाणांची आणि त्या त्या नद्यांची कहाणी शब्दांत मांडणार आहे. प्रत्येक ठिकाणाशी जोडलेली आठवण, त्या नदीचा प्रवाह, आणि मनात उमटलेली छाप— असं सगळं उलगडण्याचा ललित लेखनाचा जरी हा प्रयत्न असणार आहे तरी माझ्यातला पत्रकार त्यात डोकावेलच.

नागपूरची नाग नदी
नागपूरच्या सीताबर्डीत, म्हणजे अगदी मध्यवर्ती भागात, दोन नद्यांच्या संगमावर छान जुना बांधलेला दगडी घाट आणि त्यावर एक देऊळ आहे. कुणाकुणाला माहिती आहे?
संगम चाळ हे नाव तरी अनेक जुन्या खोडांना माहिती आहे. पण आज ती इमारत नाही आणि मेट्रो आल्यामुळे बर्डी भागाचा संपूर्ण कायापालट झालाय, त्यामुळे तिथे संगम आहे (हा संगम आहे नाग आणि पिली नदीचा आणि तिथून पुढे नाग नदी म्हणूनच तिचा प्रवास होतो) आणि असा काही सुंदर घाट आहे, एक मंदिर आहे हेच मुळी अनेकांना माहिती नाही.
विचार करा – एकेकाळी या प्रवाहात इतके स्वच्छ पाणी वाहत असेल आणि त्यामुळे ही जागा किती निर्मळ आणि पवित्र असेल? आज अर्थात ते छोटेखानी देऊळ (त्याचे नाव संगमेश्वर महादेव) छान असले तरी घाटाच्या पायऱ्या उतरून खाली पाण्यात पाय टाकावेशे वाटणार नाही इतकी त्या दोन्ही नद्यांची वाईट अवस्था आहे.
आणि हीच शोकांतिका आहे नाग नदीची.
नागपुरातल्या अनेकांना नाग नदीवरून शहराला आपले नाव मिळाले असे माहिती नसते. नागमोडी वळणे घेत जाणारी नदी म्हणून नाग नदी हे एक त्या नावाच्या उत्पत्तीचे कारण सांगतात. काही जण हे मानतात की नागपूर नागवंशी लोकांची राजधानी होती आणि त्यावरून नाग नदी हे नाव पडले. इतिहास किंवा उत्पत्ती काहीही असली तरी वर्तमानात हेच सत्य आहे की नाग नदी म्हणून न ओळखता आज तिला नाग नाला म्हणतात.
मुळात भटकंतीची आवड असल्यामुळे मी लहानपणी नाग नदीच्या अनेक भागांना भेट दिली होती. पण २०१७ मध्ये नाग नदीवर एक फोटो स्टोरी केली तेव्हा अंबाझरी तलावापासून ते नदी शहराबाहेर जिथे पडते तिथपर्यंत सलग प्रवास केला होता आणि जणू काही मला नव्यानी तिची ओळख झाली.
पूर्वी अशी समजूत होती की ही नदी अंबाझरी तलावाच्या पश्चिमेकडील बंधाऱ्यातून (weir) बाहेर पडणाऱ्या प्रवाहापासून सुरू होते. मात्र, १९९८ मध्ये संशोधकांच्या एका गटाने तलावाच्या पाणलोट क्षेत्राचा अधिक अभ्यास केला आणि त्यांना आढळले की, नदीचे खरे उगमस्थान तलावाच्या उत्तरेकडे लावा नावाच्या ठिकाणी आहे, जे त्या पश्चिमेकडील बंधाऱ्यापासून जवळ जवळ २५ किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर आहे. अंबाझरी तलावापासून नाग नदी शहरातून सुमारे १६ किलोमीटरचा वळणावळणाचा प्रवास करते. वाटेत तिला दुसऱ्या तलावातून येणारी पिली नदी येऊन मिळते. शहराची सीमा ओलांडल्यानंतर हा संयुक्त प्रवाह कन्हान नदीला जाऊन मिळतो.
अंबाझरी तलावापासून निघणाऱ्या प्रवाहाचा विआरसीई (म्हणजे आजचे विएनआयटी) कॅम्पसच्या मागून प्रवास सुरु होतो. आजही अंबाझरी स्मशान घाटावर जाताना जेमतेम ५० फूट रुंद पात्रावरचा छोटुसा पूल ओलांडून जावे लागते तेव्हा अनेकांना तीच नाग नदी आहे हे लक्षात देखील येत नाही. तिथली हिरवळ अजून टिकून आहे आणि म्हणूनच अनेक पक्षीप्रेमी तिथे बर्ड वॉचिंग करता जातात.
पुढे तिथून नॉर्थ अंबाझरी रस्त्याला जवळ जवळ समानांतर जाणारी नदी संगमापर्यंत एकदम अरुंद आणि बऱ्यापैकी स्वच्छ आहे. शंकर नगर चौकाच्या जवळ सरस्वती विद्यालयाच्या बाजूच्या पुलावरून बघितले (आणि खासकरून पासाळ्यात) तर नाग नदीच दिसते, नाग नाला नाही. प्रदूषण आपण नागपूरकर तिथेही करतोच पण तरीही पुढे रामदासपेठेत आतल्या रस्त्यावरून जाताना पण प्रवाह बऱ्यापैकी स्वच्छ आहे.
पण अशी स्वच्छ असणारी नाग नदी बर्डीवरच्या संगमानंतर रूप बदलते. आणि नदीचा नाला होतो. त्याचे कारण बहुदा पिली नदीतून येणारे प्रदूषण.
नंतर काय जास्ती करून व्यापारी भाग आणि दाट लोकवस्ती त्यामुळे सांडपाण्यासोबतच महापालिकेचा घनकचरा, नदीकाठी ढकललेला राडारोडा आणि नदीत टाकता येईल असा इतर सर्व प्रकारचा कचरा मोठ्या प्रमाणात जमा झालेला दिसतो. आशीर्वाद चौक आणि पुढे ग्रेट नाग रोड पर्यंत येता येता नदीचे पात्र जरी अजून रुंद झाले असले तरी घाण पण वाढलेली असते.
पार्डी नाका येईस्तोवर तर नदीची अवस्था फारच खराब झालेली असते आणि दुर्दैव असे की नागपूर महानगर पालिकेच्या अनेक वर्षांच्या प्रयन्तांनंतरही या परिस्थितीत काहीही फरक पडलेला नाही.
श्याम पंढरीपांडे आणि प्रद्युम्न सहस्रभोजनी यांच्या नेतृत्वाखालील एका टीमने या नदीच्या उगमस्थानाचा शोध लावला होता. त्यांनी नागपूर महानगरपालिकेकडे ‘नाग नदी खोरे पर्यावरण विकास प्रकल्प’ (Nag River Basin Eco Development Project) सादर केला होता. २००० च्या दशकात, महानगरपालिकेने हा प्रस्ताव तत्कालीन पर्यावरण आणि वन मंत्रालयाकडे पाठवला. मंत्रालयाने यासाठी ‘नीरी’ची (NEERI) मदत घेतली, परंतु हा प्रकल्प प्रत्यक्षात कधीच साकार होऊ शकला नाही.
मी फोटो स्टोरी करता पांढरीपांडे यांच्याशी बोलली होती तेव्हा त्यांनी त्यावेळेस नदीची तितकीशी दुर्गंधी न येण्याचे कारण सांगितले. “त्या काळात नागपूरच्या सांडपाण्यापैकी केवळ ३०% पाण्यावरच प्रक्रिया केली जात असे, तर ७०% सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न होता थेट नाग नदीत सोडले जात असे. आज परिस्थितीत फारसा बदल झालेला नाही. ‘ग्रे वॉटर’ (घरगुती वापराचे कमी दूषित पाणी) आणि ‘डार्क वॉटर’ (शौचालयातील सांडपाणी) दोन्ही नाग नदीत मिसळतात, त्यामुळे प्रक्रिया न केलेल्या सांडपाण्याची तीव्रता (concentration) कमी असते आणि कदाचित म्हणूनच नदीतून तितकीशी दुर्गंधी येत नाही.”
पण गेल्या दोन दशकांहून जास्ती काळात परिस्थिति फारच बदलली आहे, बिघडली आहे. मधल्या वर्षांमध्ये सरकारी – मुंबई आणि दिल्ली दोन्हीकडच्या – पैशांचा अपव्यय करणाऱ्या अनेक योजना आल्यात. नाग नदी बचाव आंदोलने झालीत. पण परिस्थिती ‘जैसे थे’च आहे.
शहराच्या सीमेवर सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (STP) आहे, परंतु त्याची क्षमता आणि कार्यक्षमता दोन्हीही अत्यंत अपुरी आहे. पर्यावरण तज्ज्ञांनी कमी क्षमतेचे आणि विकेंद्रित (de-centralised) प्रक्रिया प्रकल्प उभारण्याची शिफारस केली आहे, परंतु सरकारी यंत्रणांनी त्याकडे फारसे लक्ष दिलेले नाही.
त्यातल्यात्यात गेल्या अनेक वर्षांत महानगरपालिकेने दोनच गोष्टींवर मोठा खर्च केला आहे: पावसाळ्यापूर्वी यंत्रांच्या साहाय्याने गाळ काढणे आणि नदीच्या उगमस्थानी (अंबाझरी तलावाजवळ) नदीकाठाचे (river front) सुशोभीकरण करणे.
नुकतंच (मला वाटतं गेल्या आठवड्यात (June last week)) नाग नदीच्या प्रदूषणाबाबत टाइम्स ऑफ इंडियाच्या एका वृत्ताची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्वतःहून (suo motu) दखल घेतली. नाग नदीत मिसळणाऱ्या अंशतः प्रक्रिया न केलेल्या सांडपाण्यामुळे गोसीखुर्द धरणाच्या पाण्याच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होत असल्याच्या चिंतेची दखल घेत न्यायालयाने या वृत्ताचे जनहित याचिकेत (PIL) रूपांतर केले असे वाचल्याचे आठवते.
पण असे केवळ कोर्टाच्या आदेशाने चित्र बदलेल अशी अशा मला तरी नाही. नदी ही आपली सर्वांची जवाबदारी आहे. ‘निर्मल’ आणि ‘अविरत’ हे दोन परवलीचे शब्द लक्षात ठेऊन कामे झालीत आणि मुख्य म्हणजे नागपूरकरांनी स्वतः समोर येऊन हातभार लावला तर आणि तरच काही सुधार होऊ शकेल आणि नाग नाल्याची पुन्हा नाग नदी होऊ शकेल.
#नाग_नदी
#नागपूर
