भारत: देश हा समृद्धीचा

भूगोल, पर्यावरण माझे आवडते विषय आहेत त्यामुळे कळत नकळत माझी कुठलीही गोष्ट त्या चष्म्यातून बघितली जाते, मोजली जाते. आपल्या भारत देशाची ‘समृद्धी’ ही सुद्धा. एक साधा प्रश्न – तुम्हाला भारत देश का आवडतो? (लक्षात घ्या, मी ‘आवडतो का?’ विचारत नाहीया तर ‘का आवडतो?’ हे विचारते आहे.)

आपल्या नैसर्गिक संपदेची, भौगोलिक समृद्धीची गोष्ट आज मी सांगणार आहे. भारताच्या समांतर रेखांशाच्या पूर्वेच्या आणि पश्चिमेकडच्या देशांशी तुलना असो (म्यानमार, थायलंड / पाकिस्तान, इराण), की भारताच्या अक्षांशावरच्या उत्तरेकडच्या वा दक्षिणेकडच्या (नेपाल, अफगाणिस्थान / श्रीलंका, मॉरीशस) देशांशी तुलना असो; एक गोष्ट प्रकर्षानी जाणवते, ती ही की त्याच अक्षांश/रेखांशावर असूनही या बाकीच्या देशांना आपल्यासारखी भौगोलिक संपदा मिळालेली नाही. आपली भौगोलिक समृद्धी, आपली जैवविविधता यामागे एक मुख्य कारण हे पण आहे की आपल्या माथ्यावर अढळ असा नगाधिराज हिमालय आहे. मला सांगा, हे असं भाग्य किती देशांना लाभलं आहे?

खंडप्राय भारतात अनेक प्रकारच्या हवामानाचे भूभाग आहेत, या भौगोलिक समृद्धीचीही अनेकांना जाणीव नसते. हिमालयातील राज्ये, गंगा-यमुनेचा दोआब म्हणतात तो सुपीक प्रदेश, दख्खनचे पठार, विविध लांबीच्या नद्या, सह्याद्री आणि मलबार पर्वतरांगा, भला मोठा समुद्र किनारा आणि किनारपट्टीचा भूभाग, ईशान्य भारताचे जंगल, राजस्थानचे वाळवंट आणि अजूनही बरंच काही. ही अशी समृद्धी आहे ज्यामुळे आपल्या सांस्कृतिक समृद्धीचा पाया भक्कम झाला, ज्यामुळे भारताच्या परंपरांचा विकास त्या त्या प्रदेशाच्या नैसर्गिक समृद्धीनुसार झाला, अशी समृद्धी जिचा आपल्या पोशाख-राहणीमानावर, आपल्या घरांच्या बांधणीवर आणि अगदी, आपल्या बोलींवर देखील पगडा पडत गेला. मग जाणीव नको?

आपली सगळ्यात पहिले ‘भौगोलिक समृद्धी’ या विषयाशी ओळख होते ती शाळेत ‘वंदे मातरम’ गाताना. कधीतरी शाळेतल्या बाईंनी त्याचा अर्थ सांगितलेला असतो. ‘सुजलां, सुफलां’ अशी आपली भारतमाता हे आपल्या मनात तेव्हा ठसलेलं असतं. हळू हळू प्रवासात, कुठे वर्तमानपत्रात, कधी कुणी सांगतात तेव्हा किंवा चित्रपटातून आपल्या भोवतालच्या जगाहून वेगळं कळायला लागतं आणि ‘राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा’ महाराष्ट्रापेक्षा वेगळे भूप्रदेश आपल्याच देशाचा हिस्सा आहेत हे कळायला लागतं.

अगदी आत्ता आत्ता पर्यंत हा गेल्या अनेक सहस्त्रकांचा वारसा आपण बऱ्यापैकी जपून ठेवला होता, जो गेल्या काही वर्षात भूमंडळीकरण आणि जागतिकीकरणाच्या धबडग्यात विसरत चाललो आहोत. अगदी साधं उदाहरण द्यायचं झालं तर प्रदेशा-प्रदेशातल्या स्थानिक वातावरणाला पोषक अश्या घर बांधणाच्या पद्धती. आज त्या त्या विविक्षित पद्धती जाऊन सगळीकडे सारखीच दिसणारी सारखच सामान वापरून बांधलेली सिमेंट-कॉंक्रीटची घरे दिसत्तात सगळीकडे. शहरांमधून तर काचेच्या दर्शनीभागाच्या इमारती बांधण्याची चढाओढ सुरु आहे. आणि घरे केवळ एक उदाहरण झालं, असं प्रत्येकच बाबतीत झालंय, होतंय.

एकूणच जी वर्षानुवर्षे आपली जीवनशैली होती, ती बदलून आपण भौतिकवादाच्या आहारी जाणे सुरु झालेलं आहे. याचे अजून एक उदाहरण द्यायचे झाले तर आपल्या जीवनदायिनी नद्यांचे जे हाल आपण केले आहेत त्याचे. बिना-प्रक्रिया केलेलं मल-मूत्र नद्यांमध्ये सोडणे असो किंवा अनिर्बंध प्लास्टिकचा वापर – जो शेवटी नद्यांच्या पात्रात जाऊन तिथल्या जीवांना हानी पोहोचवतो – असो, सगळ्यांचे वाईट परिणाम जाणवू लागले आहेत. जंगल कटाई तर इतकी की त्यामुळे नद्यांच्या प्रवाहांवर फरक जाणवू लागलाय, अनेक बारमाही नद्या मोसमी झाल्यात.

वेळ आली आहे की बदलत्या जल-वायू परिवर्तनाच्या स्थितीमुळे आपल्याला खोलात जाऊन आपली जी निसर्गानुरूप जीवन पद्धती होती त्याकडे परत फिरावे लागेल. आपल्याला आपल्या सरकारी नितींमध्ये अशा प्रकारे बदल घडवून आणावा लागेल, ज्यामध्ये आपल्या नद्या पुनर्जीवीत होतील, आपली जंगले वाचतील, आपल्या हिमालयाला रस्ते-रुंदीकरणाच्या नावाखाली विद्रूप करावे लागणार नाही. केवळ सरकारी नीती बदलून चालणार नाही तर व्यक्तीशः आपल्याला स्वतःच्या राहणीमानात अनेक बदल करावे लागतील.

‘शं न मित्र शं वरुणः’ म्हणणारे आपण सौर उर्जेचा वापार भरपूर प्रमाणात करून औष्णिक विद्युत किवा जलविद्युत प्रकल्पांचे प्रमाण कमी करू शकतो. आजही बऱ्यापैकी पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे साठे वाढवून, म्हणजेच जागो-जागी विविध प्रकारे वर्षा जलसंचयन करून आपण भविष्यातली धरणे कमी करू शकतो.

शंभर टक्के नाही तरी, बऱ्यापैकी, मोठ्या प्रमाणावर काही दशकांपूर्वीची जी जीवनपद्धती होती, ती कडे वळावे लागेल. ‘केल्याने होत आहे रे’ मानणाऱ्या समाजाला आता हे प्रत्यक्षात करायची वेळ आली आहे. शुभस्य शीघ्रम!!